
सामना प्रतिनिधी । ठाणे
पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे पुढील टार्गेट रेल्वे असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांची मुंबईच्या लाईफलाईनवर नजर असून गुप्तचर संघटनांनी आगामी तीन महिन्यात रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांनी कसून तपासणी केली. यावेळी पोलिसांचे एक पथक, बॉ़म्बशोधक पथक आणि श्वानपथकाने ठाणे स्थानकावर तपासणी केली.

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलने रोज लाखो लोकं प्रवास करतात. गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची योजना आखल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले, तसेच रेल्वे हेच मुख्य टार्गेट असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी म्हटले. यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
किनारपट्टीचीही सुरक्षा वाढवली
दहशतवादी संघटनांकडून हिंदुस्थानात प्रवेश करून हल्ल्याचा इशारा दिल्याने राज्यात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमिवर किनारपट्टी भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कस्टम विभागामार्फत बोटींची कसून चौकशी करण्यात येत आहे. बोटीवरील खलाशी हिंदुस्थान आहेत की इतर देशांची याची चौकशी करण्यात येत आहे.
































































