इलेक्ट्रिक मशीनवर तळलेल्या मच्छीची विक्री, हायकोर्टाने दिली परवानगी; माजी सैनिकाच्या स्टॉलला दिलासा

इलेक्ट्रिक मशीनवर मासे तळून विकणाऱ्या एका माजी सैनिकाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या स्टॉलमध्ये मासे तळण्यास महापालिकेने मनाई केली होती. परवाना रद्द करण्याची ताकीद दिली होती. ही कारवाई न्यायालयाने रद्दबातल ठरवली.

रस्त्यावर अन्न शिजवण्यास मनाई आहे. पालिकेचा तसा नियम आहे. माजी सैनिक त्याच्या स्टॉलमध्ये इंडक्शन मशीनवर मासे तळतो. मासे तळण्यासाठी गॅसचा वापर करत नाही. त्यामुळे हे पालिकेच्या नियमाच्या विरोधात नाही, असेही न्या. फिरदोश पुन्नवीला यांनी स्पष्ट केले. तसेच स्टॉलमध्ये मासे तळण्यास मनाई करणारे पालिकेचे आदेश रद्द करण्याची माजी सैनिकाची मागणीदेखील न्यायालयाने मान्य केली.

हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धातील सैनिक

राजेंद्र सिंग असे या माजी सैनिकाचे नाव आहे. सिंग हे दिव्यांग आहे. 1965 व 1971 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धावेळी ते सेवेत होते. व्यवसाय करण्यासाठी वांद्रे येथे त्यांना एक स्टॉल देण्यात आला आहे. या स्टॉलमध्ये ते तळलेले मासे विकत होते. पालिकेने यास मनाई केली. तळलेले मासे विक्री बंद न केल्यास स्टॉलचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा पालिकेने दिला होता. याविरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.

रस्त्यावर अन्न शिजवण्याच्या परिपत्रकाचा दाखला

2019 मध्ये पालिकेने हा कारवाईचा बडगा उगारला होता. रस्त्यावर अन्न शिजवण्यास मनाई करणारे परिपत्रक महापालिकेने जारी केले आहे. त्यानुसार ही कारवाई केल्याचा दावा महापालिकेने केला होता, तो मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केला.