
राज्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकाचा निकाल 21 डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले. राज्याच्या बहुतांश भागांत मंगळवारी झालेल्या मतदानाची तातडीने दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यास आणि एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने मनाई केली. तसेच 20 डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल मतदानाच्या दिवशीच जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती रजनिश व्यास यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी 3 डिसेंबर रोजी आणि 20 डिसेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करणार असल्याची भूमिका मांडली. निवडणूक आयोगाची ही भूमिका खंडपीठाने अमान्य केली. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या मतमोजणीचा दुसऱ्या टप्प्यातील मतदान आणि निकालावर मोठा परिणाम होईल, असे खंडपीठाने नमूद केले आणि मंगळवारी झालेल्या नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल तातडीने बुधवारी जाहीर करण्यास मनाई केली.
उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या बाहेर पहारा देता येणार मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार असल्याने मतदान यंत्रे 19 दिवस सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर निर्माण झाले आहे. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या बाहेर चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहेच; पण उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही स्टाँगरूमच्या बाहेर पहारा देता येणार आहे. राजकीय कार्यकर्त्यांना गोदामाच्या बाहेर पहारा देण्याची निवडणूक आयोगाने प्रथमच परवानगी दिली आहे.
न्यायालयाचे निरीक्षण
टप्प्याटप्प्याने मतमोजणी घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय न्याय्य आणि योग्य नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी त्यात कोर्टाने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
2 डिसेंबरच्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर झाले तर त्याचा 20 डिसेंबर रोजी होणाऱया निवडणुकीच्या निकालांवर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत 20 डिसेंबर रोजी होणाऱया निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होतील असे म्हणता येणार नाही.
20 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत कोणत्याही एक्झिट पोलची प्रसिद्धी केली जाणार नाही. सर्वच निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहील.
आयोग आणि न्यायालयावर न बोललेलं बरं!
उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
आयोगाच्या घोळावर काय सांगाल, असे पत्रकारांनी विचारले असता, निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्याबद्दल न बोललेलं बरं, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. देशात अक्षरशः मनमानी सुरू आहे.
राज ठाकरे यांची टीका
मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले. देशात अक्षरशः मनमानी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. अधिक कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही.
नियमांचा चुकीचा अर्थ लावला गेला
फडणवीस यांची नाराजी
कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या पद्धतीला तरी अनुरूप नाही. नियमांचा चुकीचा अर्थ लावला गेलाय, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.




























































