
जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ कॉलेज मैदानाच्या कम्पाऊंड वॉलविरोधात दाखल झालेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. येथील मैदान हे विद्यार्थ्यांसाठी आहे. या विभागातील नागरिक त्यावर कोणताही दावा करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. नशेबाजांचा येथे वावर होऊ नये, यासाठी ही कम्पाऊंड वॉल बांधण्यात आली आहे, असे महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळून लावली.
काय आहे प्रकरण?
उमेश शिंदे व अन्य या येथील ज्येष्ठ नागरिकांनी ही जनहित याचिका केली होती. या महाविद्यालयाजवळील कम्पाऊंड वॉल 20 फुटांची आहे. 2021 मध्ये ही कम्पाऊंड वॉल बांधण्यात आली आहे. ती तोडून नियमानुसार कमी उंचीची कंपाऊंड वॉल बांधण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
धोका टाळण्यासाठी
विद्यार्थ्यांसाठी हे मैदान आहे. मात्र येथे नशेबाजांचा वावर असतो. येथे अतिक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे. हे सर्व टाळण्यासाठी मैदानाजवळ कम्पाऊंड वॉल उभारण्यात आली, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासन व महाविद्यालयाने सादर केले. ते न्यायालयाने ग्राह्य धरले.