मराठा आरक्षण : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन चुकीचे, उच्च न्यायालयाची टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा आरक्षणाबाबत राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा तरुण आणि तरुणींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. याबाबत बोलताना उच्च न्यायालयाने मानवी जिवाची किंमत ही आंदोलनापेही जास्त असून कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहनही उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनकर्त्यांना केले आहे.

राज्य सरकारला आदेश
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलना दरम्यान राज्यात झालेल्या हिंसक घटनांची दखल न्यायालयाने घेतली. तसेच या आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आत्महत्यांची आम्हाला चिंता वाटते असेही उच्च न्यायालय म्हणाले. यावर आपली बाजू मांडताना ५ सप्टेंबरपर्यंत या संदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मागासप्रवर्ग आयोगाकडून देण्यात आली. तसेच मागासप्रवर्ग आयोगाच्या माहितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनवणी उच्च न्यायालयाने मागासप्रवर्ग आयोगाला केली आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होईल हे देखील स्पष्ट करण्यात आले. १० सप्टेंबरला प्रगती अहवाल सादर करून आयोगाचे काम कुठपर्यंत आलेय, त्याचा तपशील सादर करा, असाही आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच हिंसात्मक आंदोलन करू नये, असेही ते म्हणाले.