
अभिनेत्री राखी सावंतने विनयभंगाचा आरोप केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या गायक मिका सिंगला 17 वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकरण मिटवण्यास राखीने संमती दिली. त्या आधारे उच्च न्यायालयाने गुरुवारी मिकाविरोधातील विनयभंगाचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द केले.
मिकाने 11 जून 2006 रोजी मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये बर्थ डे पार्टी आयोजित केली होती. यावेळी त्याने राखीचे बळजबरीने चुंबन घेतले होते. त्या कृत्याचा व्हिडीओ व छायाचित्रे प्रचंड व्हायरल झाली होती. नंतर राखीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मिकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला तसेच आरोपपत्रही दाखल केले होते.
तथापि, आता दोघांमध्ये समेट घडून आल्याने संबंधित गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्यास राखीने संमती दिली. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने 17 वर्षांपूर्वीचा विनयभंगाचा गुन्हा रद्द करीत मिका सिंगला मोठा दिलासा दिला.

























































