
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. अब्रुनुकसानीच्या खटल्यात पुरावे म्हणून अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास परवानगी देणारा भिवंडी न्यायालयाचा आदेश न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्दबातल ठरवला. याप्रकरणी 26 जून रोजी सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल शुक्रवारी जाहीर केला.
महात्मा गांधी यांच्या मृत्यूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात विलंबाने अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास पुंटे यांना मुभा देण्यात आली होती. भिवंडी न्यायालयाच्या त्या आदेशाला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांची विनंती मान्य केली आणि भिवंडी न्यायालयाचा आदेश रद्द करीत त्यांना मोठा दिलासा दिला. राहुल गांधी यांच्याविरोधातील खटला पूर्ण होण्यास जवळपास दहा वर्षांचा झालेला विलंब गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.