
शिंदे गटाच्या तक्रारीमुळे उमेदवारी रद्द केली म्हणून हायकोर्टात धाव घेणाऱया भाजप उमेदवाराला हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱयाने आपल्या अधिकारांचा बेकायदेशीर व मनमानी वापर केल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने आज नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. ‘17-अ’ मधील निवडणुकीला स्थगिती दिली तसेच निवडणूक आयोगाला याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत उद्या शुक्रवारी या याचिकेवर पुन्हा सुनावणी ठेवली.
भाजपचे उमेदवार नीलेश भोजने यांनी ‘17 अ’ या प्रभागातून अर्ज भरला होता, मात्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या तक्रारीवरून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. याप्रकरणी भोजने यांनी हायकोर्टात दाद मागत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आज गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. भोजने यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवयी यांनी युक्तिवाद केला. निवडणूक निर्णय अधिकाऱयांचा आदेश प्रथमदर्शनी बेकायदेशीर असल्याने तो रद्द केला पाहिजे, असा दावा केला. त्यावर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास काहीही हरकत नाही, असे निरीक्षण नोंदवले तसेच राज्य निवडणूक आयोग, नवी मुंबई महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रभाग क्रमांक ‘17 अ’ च्या नगरसेवकपदाच्या निवडणुकीसंदर्भात पुढील कोणतीही कार्यवाही करू नये, असे खंडपीठाने स्पष्ट करत याचिकेवर उद्या शुक्रवारी सुनावणी ठेवली.





























































