सण-उत्सवात बेकायदा मंडप नकोत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी । मुंबई

परवानगी नसतानाही राज्यात अनेक मंडळे गणेशोत्सवादरम्यान बेकायदा मंडप उभारत असून याकडे पालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यातील पालिका प्रशासनासह राज्य सरकारला फैलावर घेत चांगलेच झापले. मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यात बेकायदा मंडप उभारलेले आढळल्यास याद राखा, संबंधित महापालिकांवर कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी निश्चितच कठोर कारवाई करण्यात येईल अशी तंबीच न्यायमूर्तींनी यावेळी पालिका प्रशासनासह सरकारला दिली.

राज्यातील बेकायदा मंडप तसेच ध्वनिप्रदूषणाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. बेकायदा मंडपांबाबत हायकोर्टाने काढलेल्या आदेशांचे राज्य सरकार तसेच पालिका प्रशासनाकडून कोणतेही पालन होत नाही असे दिसून येते. विविध मंडळांकडूनही ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनासह राज्य सरकारने किमान आगामी उत्सवादरम्यान बेकायदा मंडप उभारले जाऊ नयेत यासाठी खबरदारी घ्यावी व असे आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.

मुंबईत ११० शांतता क्षेत्रे निश्चित

राज्यात सायलेन्स झोन किती याबाबत सरकारलाच ठोस माहिती नसल्याचे उघडकीस आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. उत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यातील सायलेन्स झोनची माहिती सादर करा असे आदेशही हायकोर्टाने सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबईत ११० शांतता क्षेत्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सरकारच्या वतीने कोर्टात देण्यात आली.