
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्स घुसखोरी करत आहेत. त्यामुळे राज्याच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात मासळीची लूट सुरू आहे. हायस्पीड ट्रॉलर्सचा लखलखाट रात्रीच्या वेळी किनाऱ्यावरून दिसत आहे. खराब सागरी हवामान आणि इतर तांत्रिक बाबींमुळे मत्स्य विभागाची गस्ती नौका अद्याप कार्यान्वित झालेली नाही. या पार्श्वभूमीवर हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण कसे आणि कोण रोखणार, असा सवाल पारंपरिक मच्छीमार करीत आहेत. यासंदर्भात पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त भादुले यांची मालवण येथील कार्यालयात भेट घेऊन गस्ती नौकेबाबत विचारणा केली. त्यावेळी येत्या तीनचार दिवसात गस्ती नौका कार्यान्वित होईल, असे मत्स्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या वाट्याची सागरी संपत्ती पराराज्यातील ट्रॉलर्स असेच लुटू लागले तर स्थानिक मच्छीमारांनी काय करायचे, महाराष्ट्राच्या वाट्याचे मत्स्यधन लुटणाऱ्या या ट्रॉलर्सवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतून पिटाळून लावावे, अशी मागणी पराडकर यांनी मत्स्य विभागाकडे केली आहे. राज्य शासनाने किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांना नेहमीच न्याय दिला आहे. पारंपरिक मच्छिमार बांधवानाही न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. मत्स्य पॅकेज हा त्याचाच भाग आहे. यापुढे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी थांबवण्यासाठी निश्चित कठोर उपाययोजना केल्या जातील. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासन स्तरावर लक्ष वेधले जाईल, असे मच्छिमार नेते तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.


























































