ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी! तळेगाव दिघेत ‘एआय’युक्त हायटेक मराठी शाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका बाजूला जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे, त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी आणि डिजिटल शिक्षणाच्या स्पर्धेत मागे पडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. अशा निराशाजनक वातावरणात संगमनेर तालुक्यातून मात्र आशेचा नवा किरण समोर आला आहे.

तळेगाव दिघे येथील धनगरवाडी येथे तब्बल दीड कोटी रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक, एआय तंत्रज्ञानयुक्त हायटेक मराठी शाळा उभी राहणार आहे. या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील नामांकित आयटी क्षेत्रातील द बाप या कंपनीचे प्रमुख रावसाहेब घुगे यांनी आता ग्रामीण शिक्षणाच्या उभारणीचाविडा उचलला असून, धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार केला आहे.

ही शाळा केवळ इमारत नसेल, तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी भविष्याची डिजिटल प्रयोगशाळाच ठरणार आहे. आधुनिक स्मार्ट क्लासरूम, एआय आधारित शिक्षण प्रणाली, डिजिटल लॅब, तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यामुळे धनगरवाडीतील विद्यार्थी आता गावातूनच जगाशी स्पर्धा करण्यास सज्ज होणार आहेत.

ग्रामीण मुलांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करावीत, यासाठी शिक्षण आधुनिक करणे गरजेचे आहे, असा विश्वास रावसाहेब घुगे यांनी व्यक्त केला.

आज अनेक जिल्हा परिषद शाळा ओस पडताना दिसत आहेत. मात्र, धनगरवाडीची ही शाळा महाराष्ट्रातच नव्हे तर देशासाठी आदर्श ठरेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

मराठी माध्यम, ग्रामीण पाश्र्वभूमी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवत ही शाळा शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू करेल. एआयचे भविष्यच आपल्या अंगणी येणार असल्याने याच स्वप्नातून धनगरवाडीमध्ये शैक्षणिक क्रांतीची नवी पहाट निश्चित उगवेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थ, शिक्षक, युवक आणि कंपनीचा संपूर्ण स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित.