
दहा वर्षांपूर्वी आदिवासी विकास योजनेत झालेल्या 6 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर आज ताशेरे ओढले. या प्रकरणी तत्कालीन मंत्री तसेच इतर दोषींना पाठीशी का घातले जाते? सनदी अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर का करत नाहीत, असा सवाल न्यायमूर्तींनी सरकारला विचारला. एवढेच नव्हे तर संबंधित विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांना पुढील सुनावणी वेळी कोर्टात हजर राहण्यास खंडपीठाने बजावले.
घोटाळ्याप्रकरणी नाशिक येथील बहिराम मोतीराम आणि गुलाब पवार यांनी ऍड. राजेंद्र रधुवंशी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गायकवाड समितीने दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आदिवासी विभागाने केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.
कारवाई शून्य
हायकोर्टाच्या आदेशानंतर केवळ नंदुरबार, धाणी, गडचिरोली भागात केवळ एफआयआर दाखल करण्यात आले. मात्र कारवाई कोणावरही करण्यात आली नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यावर गेल्या वर्षभरात दोषी मंत्री आणि सनदी अधिकाऱयांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल हायकोर्टाने केला.
आणखी एक समिती
घोटाळ्याची चौकशी करणाऱया गायकवाड समितीने सादर केलेल्या अहवालाची छाननी करण्यासाठी गेल्या वर्षी माजी सनदी अधिकारी पी.डी. करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक समिती नेमण्यात आली. बोगस अर्थसहाय्य दाखवून हजारो कोटी रुपयांचा निधी लाटण्यात आला. तसे पुरावे असतानाही कारवाई करण्यात आली नाही. हायकोर्टाने वारंवार आदेश देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा न्यायमूर्तींनी दिला.



























































