लातुरात फडकणार मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

शहिदांच्या बलिदानाची आठवण रहावी, देशप्रेमाची भावना जागृत रहावी यासाठी लातुरात मराठवाड्यातील सर्वात उंच ध्वज फडकणार आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतुन हा ध्वज लातुरात उभारला जात आहे. राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 18 जानेवारी रोजी हा राष्ट्रध्वज फडकला जाणार आहे.

देश अखंड रहावा, देशभक्तीची भावना जागृत राहावी यासाठी लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलावर १५० फूट उंचीचा ध्वज फडकावला जाणार आहे. हा तिरंगा कायम देशभक्तीची प्रेरणा देत राहणार आहे .लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विशेष रस दाखवल्यामुळे या ध्वजस्तंभाच्या उभारणीचे काम लवकर सुरू झाले आणि आता अवघ्या काही दिवसात तिरंगा फडकणार आहे.

दिनांक 18 रोजी होणार्‍या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास जिल्हाभरातून किमान पन्नास हजार नागरिक व विद्यार्थी उपस्थित राहावे असे नियोजन केले जात आहे . याप्रसंगी 11,111 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यांचे पालक, अधिकारी व कर्मचार्‍यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत गायन होणार आहे .शिवाय सकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्याचाही संयोजकांचा मानस आहे.

या कार्यक्रमाला शहर व जिल्ह्यातील ५० हजार नागरिकांना निमंत्रीत करताना राष्ट्रध्वजाची छोटी प्रतिकृती भेट दिली जाणार आहे. विविध जातीधर्मातील नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात उंच ध्वज फडकवण्याचा मान लातूर जिल्ह्याला मिळणार आहे. हा तिरंगा ध्वज देशभक्तीची प्रेरणा देत राहणार आहे. जिल्ह्यातील तरुणांनी यापासून प्रेरणा घ्यावी आणि देशाच्या विकासात सहभाग नोंदवावा असाच आपला प्रयत्न आहे. दिनांक १८ रोजी होणार्‍या या ध्वजारोहण कार्यक्रमास व त्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे आणि देशकार्यात आपलेही योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.