हायस्पीड इंटरनेट वापरणाऱ्यांची ‘झोप’ उडाली !

सामना ऑनलाईन । लंडन

सोशल मीडियाच्या या युगामध्ये इंटरनेटच्या स्पीडला खूपच महत्त्व आहे. व्हिडीओ, फोटो, गाणे डाऊनलोड करायचा असो किंवा अपलोड करायचा असो सगळीकडे स्पीड महत्त्वाचा असतो. परंतु आता हायस्पीड इंटरनेटसाठी ब्रॉडबँड कनेक्शन, वायफाय यांचा वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका नव्या सर्वेक्षणातून दावा करण्यात आला आहे की हायस्पीड इंटरनेटच्या वापरामुळे तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होतो.

या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, जे लोक डिजिटल सबस्क्रायबर लाईन (डीएसएल) वापरतात ते डीएसएल इंटरनेट न वापरणाऱ्यांच्या तुलनेत तब्बल २५ मिनिटे कमी झोपतात. यामुळे दिवसभर त्यांच्या अंगात आळस आणि डोळ्यावर झोपेची झापड असते. इटलीच्या बोकोनी विद्यापिठीच्या आणि अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग येथील संशोधकांनी हा दावा केला आहे. हायस्पीड इंटरनेटच्या वापरामुळे अशा लोकांची झोप पूर्ण होत आणि याबाबत ते असमाधानी असतात. यामुळे सकाळी उठल्यानंतर घरातील कामं, ऑफिसची कामं आणि इतर कामांमध्ये त्यांचे लक्ष जास्त लागत नाही.

बोकोनी विद्यापिठाचे प्राध्यापक फ्रान्सेस्को बिल्लारी यांनी याबाबत सांगितले की, ‘डीएसएल इंटरनेट वापर करणारी लोकं डीएसएल न वापरणाऱ्या लोकांपेक्षा २५ मिनिटं कमी झोपतात. अशी लोकं ७ ते ९ तासांची झोप घेऊ शकत नाही. त्यामुळे ते असमाधानी राहतात.’