
बहुचर्चित नॅशनल हायस्पीड बुलेट ट्रेन मुंबई-हैदराबाद ही रेल्वे येणाऱया चार वर्षांत प्रत्यक्ष प्रवाशांना प्रवासाचा आनंद देणार आहे. विशेष म्हणजे, सोलापूर शहर आणि पंढरपूर स्थानकाला या हायस्पीड ट्रेनचा विशेष थांबा म्हणून दर्जा मिळणार आहे. ही रेल्वे 320 किलोमीटर प्रतितास या वेगाने साडेतीन तासांत मुंबई ते हैदराबाद हा प्रवास करणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक संतोष देसाई यांनी दिली आहे.
संतोष देसाई म्हणाले, नॅशनल हायस्पीड रेल्वे संस्थेच्या वतीने प्रकल्पाचे काम होणार असून, याच्या सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. प्रकल्प संचालकांच्या मते, हा स्वतंत्र रेल्वेमार्ग असून, ही गाडी जमिनीपासून 15 मीटर उंच असणार आहे. एका किलोमीटरच्या रुळाची बांधणी करण्याकरिता 100 कोटी रुपये खर्च येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
हायस्पीड रेल्वेचा ठाण्यानंतर दुसरा थांबा नवी मुंबईच्या विमानतळाजवळ असेल. त्यानंतर कामशेत किंवा लोणावळा तिसरा, त्यानंतर चौथा थांबा पुणे आणि नंतर बारामती, त्यानंतर थेट पंढरपूर आणि सोलापूर असा असणार आहे. पुढे गुलबर्गा, जाहिराबाद, संगारेड्डी, त्यानंतर शेवटचे स्थानक हैदराबाद असणार आहे. या नियोजनानुसार केवळ 11 स्थानकांवर ही रेल्वे पोहोचणार आहे. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नागपूर आणि मुंबई-हैदराबाद या तीनही बुलेट ट्रेनचे केंद्रस्थान ठाणे असणार आहे.
हायस्पीड बुलेट ट्रेन मार्गाचे सर्वेक्षण मे 2021पर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर त्याचे आरेखन म्हणजेच ड्रॉइंग पूर्णपणे तयार होणार आहे. अवघ्या काही मिनिटांत मुंबई ते पुणे आणि पुणे ते सोलापूर गाठणे सहज शक्य होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक संतोष देसाई यांनी सांगितले.































































