सिंधुदुर्ग किनारपट्टीवर हिक्का वादळाचा परिणाम; मासेमारी नौका बंदरात स्थिरावल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रात मध्यभागी घोंगावणाऱ्या हिक्का वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून येत आहे. खोल समुद्रात वादळ स्थितीमुळे मोठ्या नौका बंदरातच स्थिरावल्या आहेत. त्यामुळे मासेमारीवरही परिणाम झाला आहे.

दरम्यान, वादळ स्थितीमुळे पावसाचेही आगमन झाले आहे. मंगळवारी सायंकाळी अनेक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सुरूच राहिल्यास भातपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वादळाचा जोर खोल समुद्रात अधिक आहे. किनाऱ्यावर वारा व लाटांची तीव्रता तेवढी जाणवत नाही. मात्र वादळाचा जोर वाढल्यास किनाऱ्यावर वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

खोल समुद्रातील मासेमारी ठप्प

खोल समुद्रात जाणाऱ्या मोठ्या मासेमारी नौका वादळामुळे दोन दिवस समुद्रात गेल्या नाहीत. नौकांनी बंदरातच स्थिरावण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या नौकातून काहीशी मासेमारी सुरू आहे. वादळाचा परिणाम आणखी दोन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.