हिमाचल प्रदेशातील मंत्र्यांची NHAI अधिकाऱ्यांना मारहाण, गुन्हा दाखल

हिमाचल प्रदेशातील मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी अचल जिंदाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. 30 जून रोजी शिमला येथील भट्टाकुफेर परिसरात पाच मजली इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी भेट देताना मंत्री अनिरुद्ध सिंह आपल्याला मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याचा आरोप अचल जिंदाल यांनी केला आणि याप्रकरणी तक्रारी दाखल केली. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी चर्चा केली आहे. गडकरी यांनी X वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. X वर पोस्ट करत नितीन गडकरी म्हणाले आहेत की, ‘”हिमाचल प्रदेश पंचायती राज मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिमला येथील एनएचआय पीआययूचे व्यवस्थापक अचल जिंदाल यांच्यावर केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. कर्तव्य बजावणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यावर असा क्रूर हल्ला केवळ वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणत नाही तर, संस्थात्मक अखंडतेलाही तडा देणारा आहे. मी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना सर्व दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.”