
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ नैराश्यात असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्लवी ही हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील गव्हर्मेंट डिग्री कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील विक्रम कुमार यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी त्याच महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनी हर्षिता, आकृती आणि कोमोलिका यांनी आपल्या मुलीला धमकावले आणि मारहाण केली. तसेच अशोक कुमार नावाच्या प्राध्यापकाने पल्लवीशी अश्लील कृत्ये केली. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली, ज्यामुळे तिची तब्येत बिघडली, असा आरोप पल्लवीच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.
सुरुवातीला पल्लवीवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे 26 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्राध्यापक अशोक कुमार आणि तिन्ही विद्यार्थिनींवर धर्मशाळा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहे.




























































