
हिमालयातील बर्फाचा धोका वाढला असून हिमनदी त्सुनामी बनत चालली आहे. याने मोठी जीवित हानी होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. त्सुनामीचे केंद्रस्थान नेहमीच समुद्र राहिला आहे. मात्र पहिल्यांच नदीतून महात्सुनामी येणार असल्याचे भाकीत आहे. या महात्सुनामीने तब्बल 93 लाख लोकांच्या जिवाला धोका होऊ शकतो.
सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये या हिमालयून त्सुनामीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. रवींद्र कुमार आणि सौरभ विजय यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. या अहवालानुसार 2016 ते 2024 दरम्यान हाय माउंटन आशिया प्रदेशातील या तलावांचे क्षेत्रफळ 5.5 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
पर्वतांमधील हिमनद्या वितळतात तेव्हा त्यांचे पाणी पोकळीत जमा होते. तेथे तलाव तयार होतात. हे तलाव सैल खडक, बर्फ आणि ढिगाऱयांच्या (मोरेन) नैसर्गिक धरणांनी वेढलेले असतात. जागतिक तापमानवाढीमुळे पाण्याचा दाब वाढतो किंवा हिमस्खलन या तलावांवर येते तेव्हा ही धरणे फुग्यांसारखी फुटतात. याला हिमालयीन त्सुनामी म्हणतात.
तलावांचे क्षेत्रफळ वाढले
हिमालयीन प्रदेशातील हिमनदी तलावांचे क्षेत्रफळ 5.5 टक्केने वाढले आहे. या 32 हजारहून अधिक अस्थिर तलावांमुळे 93 लाख लोकांना त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. एकटय़ा भारतात 30 लाख लोक या तलावांजवळ राहतात. शास्त्रज्ञांनी उपग्रह डेटा वापरून इशारा दिला आहे की, जागतिक तापमानवाढीमुळे केदारनाथसारखी आपत्ती पुन्हा येऊ शकते.



























































