अदानीनंतर आता हा उद्योगपती हिंडेनबर्गच्या निशाण्यावर, अनेक गंभीर आरोप

24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. जगातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहाने ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला. त्याचा मोठा झटका अदानी समूहाला बसला. अदानी समूहानंतर आता हिंडेनबर्गने तंत्रज्ञान कंपनी ब्लॉक इंकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार, जॅक डोर्सी यांच्या ब्लॉक इंकने फसवणूक करून आपल्या वापरकर्त्यांची संख्या वाढवली. त्याच वेळी, त्यांनी त्यांचा ग्राहक संपादन खर्च कमी केला. या बातमीनंतर ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे आता यूएस मार्केटमध्ये घबराट पसरली आहे, कंपनीचे शेअर्स 20% पर्यंत घसरले आहेत.

ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी 2009 मध्ये ब्लॉक इंकची स्थापना केली. ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. हिंडेनबर्गने आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, “आम्ही 2-वर्षांच्या तपासात निष्कर्ष काढला आहे की ब्लॉक इंकने लोकसंख्याशास्त्राचा गैरफायदा घेतला असून तो अन्यायकारक आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांची दिशाभूल करत वस्तुस्थितीशी खेळ केला असल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. कंपनीच्या कॅश अ‍ॅपच्या कार्यक्रमात अनेक त्रुटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अदानी समूहावर आरोप झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर, हिंडेनबर्गच्या संस्थापकांनी 23 मार्च 2023 च्या पहाटे ट्विट करून नवीन खुलाशांची माहिती दिली. या ट्विटमध्ये कंपनीने नवीन अहवाल येण्याबाबत सांगितले होते.