
हिंदुस्थानच्या हिंदी भाषेचा मान जगभरात अधिकच वाढला आहे. जगात सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी मोठी भाषा हा बहुमान हिंदी भाषेने मिळवला आहे. विशेष म्हणजे जगात सार्वधिक बोलल्या जाणाऱया भाषणमध्ये बंगाली भाषेने सातवे स्थान मिळवले आहे. जगातील टॉप टेन भाषांमध्ये हिंदुस्थानच्या दोन भाषांनी स्थान मिळवले आहे हा हिंदुस्थानचा गौरवच मानला जातोय. हिंदुस्थानात बंगालीपाठोपाठ मराठी भाषेने सर्वाधिक बोलल्या जाणाऱया भाषांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. जगभरात 63.7 कोटी नागरिक हिंदी बोलतात. इंग्रजीने मात्र जगातील टॉपचे स्थान स्वत:कडे राखले आहे. इथनोलॉग या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या पाहणीत हि भाषावारी स्पष्ट झाली आहे.
इथेनोलॉगच्या अहवालानुसार सध्या जगभरात 7 ,117 भाषा बोलल्या जातात आणि हिंदुस्थानात 456 भाषांचा वापर केला जातोय. 23 भाषा अशा आहेत कि जगातील सर्वाधिक नागरिक त्यांचा जास्त वापर करतात. पहिली भाषा मायबोली असेल तर दुसऱया व्यवहारी भाषेच्या रूपात इंग्रजीचा सर्वाधिक वापर होत आहे. जगात व्यवहारी (नॉन-नेटिव)म्हणून इंग्रजी टॉपवर आहे ,तर मायबोली (नेटिव्ह ) म्हणून चीनची मंदारीन ही भाषा नंबर एक वर आहे.मायबोली म्हणून हिंदी देशात चौथ्या तर जगात सर्वाधिक वापरासाठी तिसऱया स्थानावर आहे.
जगातील टॉप टेन भाषा आणि त्यांचा वापर (प्रति लाखांत )
1) इंग्रजी 1262 नागरिकांकडून
2) चिनी मंदारीन 1120
3) हिंदी 637
4) स्पॅनिश 538
5) फ्रेंच 277
6) अरबी 274
7) बंगाली 265
8) रुसी (रशियन ) 258
9) पोर्तुगाली 252
10) इंडोनेशियाई 199
देशात माय मराठीने राखलेय तिसरे स्थान
हिंदुस्थानी भाषांच्या वापराचा विचार केला तर सर्वाधिक वापर केल्या जाणाऱया मायबोलीच्या शर्यतीत मराठी भाषा तिसऱया स्थानावर आहे. बंगाली भाषा 26.5 कोटी नागरिक तर मराठी भाषा 9.5 कोटी नागरिक बोलीभाषा म्हणून वापरत आहेत. त्यापाठोपाठ तेलगू (9.3 कोटी), तामिळ (8.4 कोटी ) आणि पश्चिमी पंजाबी (8.3 कोटी )अशा संख्येत नागरिक वापरतात.
जगातील 2,926 भाषांचे अस्तित्वच धोक्यात
जगात 23 भाषा अशा आहेत कि जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या त्या भाषांचा वापर करते. दुर्दैवाने जगातील 2,926 बोली भाषांचे अस्तित्व जागतिकीकरणामुळे धोक्यात आले आहे. आशिया खंडात 2,294, आफ्रिका खंडात 2,144 , अमेरिकेत 1,061 तर पॅसिफिक खंडात 1,313 भाषांचा वापर करतात.




























































