
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खैरपूर जिह्यामधील कुंब या शहरात हिंदू मंदिरावर हल्ला करून त्याची तोडफोड करतानाच त्यातील पवित्र मूर्ती अणि धर्मग्रंथांचीही होळी करण्यात आली. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर तेथील हिंदूंमध्ये घबराट पसरली आहे.
‘श्याम सुंदर सेवा मंडळ’ या संस्थेच्या हिंदू मंदिरावरील हल्ल्याचे वृत्त ‘सामा टीव्ही’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. त्या मंदिराचा विद्ध्वंस करणारे हल्लेखोरांचे टोळके संध्याकाळी 6 वाजण्यास सुमारास मंदिरात घुसले. हल्लेखोरांनी मंदिरात तोडफोड करतानाच ‘भगवद्गीता’ आणि ‘गुरू ग्रंथसाहिब’ यांच्यासहित तीन धर्मग्रंथांची त्यांनी होळी केली. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी 15 मिनिटांत पळ काढला. हिंदू मंदिरात आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक बालकांनी आरडाओरडा करीत रहिवाशांचे आगीकडे लक्ष वेधले. त्यानंतर हिंदू बांधवांनी मंदिराकडे धाव घेतली.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर मंदिराच्या खिडक्यांवरील बोटांच्या ठशांवरून तीन जणांना अटक केली आहे, असे मंदिराचे प्रमुख विजयकुमार यांनी सांगितले.
मंदिरांच्या सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करा!
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या या घटनेनंतर मंदिरांच्या सुरक्षेसाठी ‘स्पेशल टास्क फोर्स’ स्थापन करण्यात यावा, अशी मागणी पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे सल्लागार कुमार हरदासांनी यांनी सरकारकडे केली आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात येणारा टास्क फोर्स बिगर मुस्लिम पोलिसांचाच असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे.


























































