
मालेगाव येथून बंदोबस्तावरुन परत आलेल्या हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी चार जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 11 झाली आहे. धक्कादायक बाब उघड झाली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील अधिकारी व जवान मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये परतले होते. या 194 अधिकारी व जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. यापैकी सहा जणांना कोरोणाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल 21 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. दरम्यान, एसआरपीच्या विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 4 जवानांचा पहिला थ्रोट स्वाब अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, चार जवानांना जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करून त्यांचे दुसऱ्यांदा थ्रोट स्वाब घेण्यात आले होते. आज 27 एप्रिल रोजी या चार जवानांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास व वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.






















































