हिंगोलीच्या शेतकऱयांचा अन्नत्याग रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

बँकेचे कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढणाऱया शेतकऱयांची मिंधे सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे या शेतकऱयांनी अन्नत्यागाचे अस्त्र उपसले असून हिंगोली जिल्हय़ातील गोरेगाव तहसील कार्यालयासमोर रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.

यंदाच्या वर्षी खरीप हंगामात कधी पावसाचा खंड, तर कधी अतिवृष्टी यामुळे शिवारातील पिकांची नासाडी झाली. सोयाबीन, कापूस, तूर असे कोणतेही खरीप पीक शेतकऱयांच्या हाती आले नाही. पीकविमा काढूनही उपयोग झाला नाही. खरिपासाठी म्हणून काढलेले कर्ज मानगुटीवर बसले. बँकांनी कर्ज परतीसाठी तगादा लावल्याने गोरेगावच्या दहा शेतकऱयांनी आपली किडनी, लिव्हर तसेच डोळे विक्रीला काढले. दरपत्रकासह अवयव विक्रीची जाहिरात सोशल मीडियावर झळकताच खळबळ उडाली. त्यानंतर या शेतकऱयांनी मुंबई गाठली. परंतु सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. या शेतकऱयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. राज्यातील मिंधे सरकारने आपल्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने या शेतकऱयांनी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर दूध सांडून सरकारचा निषेध करत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.