
सोलापूर ते हिंगोली बसमधून प्रवाशांना सुखरूप घेऊन आल्यानंतर एसटी बस चालकाचा हिंगोली बस स्थानकाच्या जुन्या विश्रांती कक्षात मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील तालुका राळेगाव येथील सुरेश सदाशीव सलामे (56, ह.मु. रिसाला बाजार, हिंगोली) हे मागील काही वर्षांपासून हिंगोली आगार येथे चालक या पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी सुरेश सलामे हे हिंगोली-सोलापूर बस घेऊन गेले होते. 5 ऑक्टोबर रोजी सोलापूर-हिंगोली प्रवाशी घेऊन निघाले होते. सुरेश सलामे यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे त्यांनी प्राथमिक उपचार घेऊन थोडे बरे वाटल्यानंतर बस घेऊन हिंगोलीकडे निघाले होते. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास प्रवाशांना हिंगोली बस स्थानकात सुखरूप आणून सोडले. अस्वस्थ वाटू लागल्याने बस स्थानकाच्या जुन्या विश्रांती कक्षात असलेल्या पेटय़ावर जाऊन झोपले होते. रात्री उशिराने बाहेरील आगाराची कोणतीही बस न आल्यामुळे विश्रांती कक्षाकडे कोणीही गेले नाही. दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कर्मचारी गेल्यानंतर सुरेश सलामे हे मृतावस्थेत आढळून आले.






















































