
सामना प्रतिनिधी। हिंगोली
दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सर्वसामान्यांची लूट होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली शहरात गाढव मोर्चा काढण्यात आला. गाढवाच्या गळ्यात भाजपचे उपरणे आणि बैलगाडीमध्ये दुचाकी वाहने ठेवून हा मोर्चा काढण्यात आला.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून दररोज पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली जात असून घरगुती वापराच्या गॅसचे दरही आकाशाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनतेची होणारी होरपळ लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने हिंगोली शहरात बुधवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. शहरातील गांधी चौकात दोन गाढव उभे करुन त्यांच्या गळ्यात भाजपचे उपरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. तसेच हातगाडी, बैलगाडीवर दुचाकी ठेवून या मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या वेगवेगळ्या भागातून इंधन दरवाढ मागे घ्या, जीवनावश्यक वस्तुचे भाव स्थिर ठेवा, शिवसेना जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवसैनिकांनी शहर दणाणून सोडले होते. जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.































































