
हिंगोली शहरात नागरिकांनी संचारबंदी व सोशल डिस्टसिंग राखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दहा तृतीयपंथी कोरोना वॉरियर्स म्हणून नगर परिषद कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत.
हिंगोली शहरात एक दिवसा आड जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या दरम्यान बाजारात मोठी गर्दी होऊन नागरिकांकडुन सोशल डिस्टसिंगचे पालण केले जात नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नगर परिषदेचे कर्मचारी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह दंड आकारण्याचे काम देखील करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी शहरातील दहा तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करून तृतीयपंथीयांना कोरोना वॉरियर्स म्हणून कर्मचाऱ्यांसह सहभागी करून घेतले आहे. रविवारी सकाळपासूनच या तृतीयपंथीयांनी शहरातील बाजारपेठ व भाजीपाला खरेदी केंद्रावर जाऊन नागरिकांना सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या. तसेच मोटार सायकलीना प्रतिबंध करण्याचे काम देखील केले.
कामाचा मावेजा देणार- मुख्याधिकारी रामदास पाटील
हिंगोली नगर परिषद कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यात उतरलेल्या या तृतीयपंथीयांचे निश्चितच कौतुक करावे लागेल असे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दैनिक सामना प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले. लवकरच त्यांना ओळखपत्र, उन्हापासून संरक्षण करण्याकरिता टोप्या, मास्क, सॅनिटायझर, शिट्टी व नगर परिषदेच्या मदत केंद्रामार्फत काम केल्याच्या बदल्यात मावेजा देखील देण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.



























































