मिंधेंचे खासदार म्हस्केंना भूमिपूजनापासून हिरानंदानीवासीयांनी रोखले, कावेसर तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुप करू नका !

कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचा नारळ फोडण्यासाठी आलेले मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना आज हिरानंदानीतील रहिवाशांनी रोखले. सुशोभीकरणाच्या नावाखाली इतर तलावांप्रमाणे कावेसरचा तलाव विद्रुप करू नका, अन्यथा तुमच्या विरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशाराच हिरानंदानीवासीयांनी म्हस्के यांना दिला.

कावेसर तलाव हा 150 वर्षांहून अधिक जुनी पाणथळ जागा असून तेथे जुनी ऐतिहासिक झाडे आहेत. पांढरे कमळ येणारे एकमेव तलाव आहे. विशेष म्हणजे जिथे पांढरे कमळ येतात तेथे पर्यावरणाची शुद्धता चांगली मानली जाते. तसेच या तलावाच्या आसपास आजही कोणत्याही प्रकारचे काँक्रीटीकरण झालेले नाही. जॉगिंग ट्रॅक, शौचालये अशी बांधकामे नसल्याने तसेच दिव्यांच्या किंवा लेझर शोमुळे होणाऱ्या जैवविविधतेला धोका इथे उद्भवला नव्हता. यामुळे येथे स्थलांतरित पक्षी सरपटणारे प्राणी आणि उभयचरांसाठी अधिवासाचे ठिकाण आहे. स्थानिक रहिवाशांनी या भागातील 40 ते 50 प्रकारचे जलचर, जमिनीवरील पक्षी, स्थलांतरित पक्षी यांची नोंद केली आहे. अनेक नैसर्गिक जीव या भागाकडे आकर्षित होत असून सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, कोळी आणि अनेक प्रकारची फुलपाखरे, ड्रॅगनफ्लाय, मधमाशा आणि इतर कीटक आढळतात.

पालिकेने या तलावाच्या सुशोभीकरणाचा घाट घातला आहे. मात्र त्यामुळे येथील भूभागात बदल होऊन काँक्रीटीकरणामुळे तलावाचे नैसर्गिक रुपडेच नष्ट होणार आहे. त्याचबरोबर येथील वर्दळ वाढून वन्यजीवांचा अधिवासच धोक्यात येण्याची भीती हिरानंदानीवासीयांनी व्यक्त केली. पाणथळ नियमानुसार या तलावाचे संरक्षण करावे आणि काँक्रीटीकरणाचा प्रकल्प रद्द करावा, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा ग्रीन कलेक्टीव्ह ग्रुपचे निशांत बंगेरा यांनी दिला.