मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक यंदा 30 तास

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत सांगली जिह्यात अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या जल्लोषात श्री बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी दुपारी बारा वाजता शास्त्री चौकातील छत्रपती शिवाजी मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे सर्वांत पहिले विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. शेवटच्या मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन आज दुपारी चार वाजता झाले. ऐतिहासिक असणाऱ्या मिरजेतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक यंदा 30 तास सुरू होती.

अनंत चतुर्दशीला मिरज शहर 172, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 31, मिरज ग्रामीण आणि सांगली शहर प्रत्येकी दोन असे एकूण 207 सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. या मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते.

गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने अचूक नियोजन केले होते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मिरजेच्या गणेश उत्सवाला 116 वर्षांची परंपरा आहे. विविध संघटना, पक्ष भव्य आणि आकर्षक स्वागतकमानी मिरवणूक मार्गावर उभ्या करतात. स्वागतकमानी म्हणजे मिरजेच्या विसर्जन मिरवणुकीतील खास आकर्षण असते. मिरवणूक आणि स्वागतकमानी पाहण्यासाठी आसपासच्या जिह्यातून आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक मिरजेत येतात. यावर्षी विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास चालली.

शिवसेनेची आकर्षक स्वागतकमान

लक्ष्मी मार्केट परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य आकर्षक स्वागतकमान उभारण्यात आली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सर्व गणेश मंडळांचे स्वागत केले.