
बद्रीनाथ खंडागळे । पैठण
शहरातील प्राचीन गणेश मंदिरांना ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक संदर्भ असून, अन्यत्र न आढळणाऱ्या आगळ्यावेगळ्या रूपातील गणराय येथे पाहायला मिळतात. ‘पेशव्यांचा गणेश’ ‘शनी-गणपती’ ‘पावन गणपती’ व ‘निद्राधीन शेंगट्या गणेश’ अशी त्यांची नावे आहेत! गोदावरी नदीकाठावर असलेल्या गणेश घाटावरील लंबोदराचे पुरातन मंदिर ‘श्री’भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
एकेकाळी धर्मपीठाचा मान मिरवणाऱ्या पैठणनगरीत अनेक देवतांची पुरातन मंदिरे आहेत. तसेच गणपतीची प्रसिद्ध देवळे असून, या वास्तूंना प्राचीन व ऐतिहासिक संदर्भ आहेत. नागघाटावरील ‘पेशवे गणपती’ प्रसिद्ध आहे. पैठणचे सावकार व पेशव्यांचा आर्थिक हितसंबंध जगजाहीर आहे. यानिमित्त पेशव्यांचे पैठणला येणे-जाणे होते. पेशव्यांनी शालिवाहन कालीन नागघाटावर ‘श्री’ मूर्ती स्थापन करून छोटेसे मंदिर उभारले. ‘पेशवा गणपती’ म्हणून हे देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. गोदावरी नदीच्या ‘घाटा’वरील गणपती मंदिरही प्राचीन आहे. या मंदिरामुळे हा घाट ‘गणेश घाट’ म्हणून ओळखला जातो.
संत एकनाथ महाराज यांच्या राहत्या वाड्याच्या जवळच असलेला ‘शनी गणपती’ तर समस्त पैठणकरांचे भक्तिकेंद्र आहे. येथील गणेशाची मूर्ती शनी देवासोबत आहे. अन्यत्र कुठेही न आढळणारे हे ‘शनी-गणपती’चे एकत्रित वास्तव्य पैठणला पाहायला मिळते. दर शनिवारी या मंदिरात गणेशभक्तांसह शनिभक्तांची गर्दी असते. काळ्या पाषाणाची दीड पूâट उंची असलेली शनी मूर्ती लक्षवेधक आहे. त्याच्या मागेच साडेतीन फूट रूंद आणि तीन फूट उंचीची श्रीगणेशाची सुंदर अशी चतुर्भुज मूर्ती आहे. मात्र शेंदराच्या सततच्या वापरामुळे या मूर्तीचे मूळ रुप शेंदराच्या खाली दिसेनासे झालेले आहे. शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या घराण्यातील कुलाचार याच मंदिरात चालत असे. नाथवंशज आजही ही परंपरा पाळत आहेत. बाजीराव पेशव्यांचीही पैठणच्या या शनी गणपतीवर नितांत श्रद्धा होती. बाजीराव पेशव्यांना शनीची साडेसाती चालू होती. तेव्हा त्यांना पालखेडच्या लढाईला सामोरे जावे लागले होते. युद्धाला जाण्यापूर्वी बाजीरावांनी नागघाटावरील पेशवा गणेशासह शनी गणपतीच्या या मंदिरात येऊन दर्शन घेतल्याचे दाखले मिळतात.
जायकवाडी रस्त्यावर ज्ञानेश्वर उद्यान प्रवेशद्वार क्रमांक १ समोरील परिसरात ‘निद्राधीन शेंगटे गणपती’ दुर्लक्षित असले तरी भाविक याजागी चतुर्थीला पूजाअर्चा करतात. संभाजीनगर-पैठण मार्गावर कातपूर फाट्यावर ‘पावन-गणेश’ मंदिर आहे. मागील ५०-५५ वर्षांपूर्वीपासून या देवस्थानची कीर्ती वाढत गेली. पंचक्रोशीतील तरुणाईचा आवडता देव म्हणून पावन गणेश सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. याच्या अनेक आख्याईका आहेत. पैकी ‘पायी दर्शन’ घेणाऱ्या भाविकांना हा गजानन प्रसन्न होतो, असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला भल्या पहाटेपासून पायी जाऊन दर्शन घेणाऱ्या तरुण भक्तांची संख्या वाढत आहे. पैठण, पिंपळवाडी, एम.आय.डी.सी., मुधलवाडी, कातपूर, नारायणगाव आदी गावांतून आज पायी चालत येऊन हजारो लंबोदरभक्तांनी दर्शन घेतले. उच्चभ्रुंची वसाहत असलेल्या भवानीनगर येथील गणपती दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. पूर्वीच्या कालखंडात पैठणच्या चतु:सीमेवर पेशवे गणपती, गणेश गणपती, शनी गणपती व निद्रा गणपती संकटमोचक म्हणून स्थापित होते. त्यामुळे राजधानी प्रतिष्ठान नगरी सुरक्षित होती, असे मानले जात होते. चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देणारे अशीही ओळख या गणपतींची असल्याची माहिती पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष वेदशास्रसंपन्न पुरोहित सुयश शिवपुरी व सामाजिक कार्यकर्ते रमेश पाठक यांनी दिली.





























































