
तरूणाला रॉडने मारहाण करून खूनाचा प्रयत्न करीत सात महिन्यांपासून फरार झालेल्या सराईताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. जितेंद्र उर्फ मोन्या संजय लोंढे (रा.तळजाई वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने 25 मार्चला अथर्व रविंद्र अडसुळ (रा. तळजाई वसाहत) याच्यावर रॉडने हल्ला करून खूनाचा प्रयत्न केला होता. मावशीला भेटण्यासाठी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली.
तरूणाला रॉडने मारहाण करून खूनाचा प्रयत्न करीत फरारी झालेल्या सराईताला अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई आणि पोलीस निरीक्षक युनुस मुलानी यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी सराईत जितेंद्र लोंढे त्याच्या मावशीकडे तळजाई परिसरात राहायला येणार असल्याची माहिती अंमलदार भुजंग इंगळे आणि सागर शिंदे यांना मिळाली.
त्यानुसार पथकने वस्तीत जाऊन सापळा रचून थांबले असता, आरोपीला ताब्यात घेउन अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, बापु खुटवड, महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर, शिवलाल शिंदे, सागर सुतकर यांनी केली.
सराईत वेशांतर करून राहत होता
आरोपी जितेंद्र उर्फ मोन्या याने तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर फरार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन तो घर सोडुन पसार झाला. त्यानंतर त्याने पंढरपुर व मांजरी हडपसर पुणे परिसरात वेष बदलुन राहत पोलिसांना गुंगारा दिला होता. मात्र, मावशीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी त्याला अटक केली.

























































