दोन मालिका, तीन रंगांचे चेंडू; ‘हिटमॅन’ रोहित साकारणार इतिहास

790

बांगलादेश संघाचा यंदाचा हिंदुस्थान दौरा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि विविध विक्रमांनी गाजणारा ठरणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीरहिटमॅनरोहित शर्मा या दौऱ्यात एका आगळ्या विक्रमाला गवसणी घालणारा हिंदुस्थानी क्रिकेटर ठरणार आहे. तो विक्रम असेल एकाच दौऱ्यातील दोन मालिकांत एकाच महिन्यात सफेद, लाल आणि गुलाबी अशा तीन रंगांच्या वेगवेगळ्या चेंडूने खेळण्याचा. कोलकाताच्या ऐतिहासिक दिवसरात्र कसोटी लढतीत गुलाबी चेंडू प्रथमच वापरला जाणार आहे. या लढतीत रोहित टीम इंडियातून खेळल्यास तो असा पराक्रम करणारा पहिला हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरेल.

 आयसीसी वर्ल्ड टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत कोलकाता येथे हिंदुस्थान आणि बांगलादेश संघांत हिंदुस्थानातील ही पहिली डेनाइट कसोटी लढत खेळवली जाणार आहे. तर 14 नोव्हेंबरला पहिली नियमित डे कसोटी इंदूरमध्ये लाल चेंडूने खेळवली जाईल. डेनाइट कसोटी गुलाबी चेंडूने खेळवली जाणार आहे. या लढतीत रोहित खेळल्यास तो लाल, पांढरा आणि गुलाबी रंगांच्या चेंडूने खेळणारा पहिला हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरेल. रोहितचा सध्याचा धडाकेबाज फॉर्म पाहता तो कसोटीतही टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज म्हणून खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे.

रोहितची आगळी वेगळी हॅटट्रिक

रोहित शर्मा बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिकेत पांढऱ्या चेंडूने खेळला आहे. आता कसोटी संघात रोहित असणार हे निश्चितच आहे. रोहित इंदूर कसोटीत लाल चेंडूने तर कोलकाताच्या दिवसरात्र कसोटीत गुलाबी चेंडूने खेळेल. एकाच संघाविरुद्धच्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय मालिकांत तीन वेगवेगळ्या रंगाच्या चेंडूने खेळण्याची आगळीहॅटट्रिकरोहित साकारणार आहे. अर्थात टी-20 मालिकेत खेळणारे बांगलादेशचे लिटन दास, महमुदुल्लाह, मुशफिकूर रेहमान, मोहम्मद मिथुन, मुस्तफिजूर रहमान, अमिनुल इस्लाम आणि मोसाददेक हुसेन हे खेळाडूही दिवसरात्र कसोटी खेळल्यास रोहितसारखाच पराक्रम करण्याच्या उंबरठय़ावर आहेत. कारण तेही टी-20 मालिकेत पांढऱ्या चेंडूने खेळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या