पोलीस थकले असतील पण हिंमत हरलेले नाहीत! गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक

‘कोरोना महामारीच्या काळात राज्यातील पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे ते जरूर थकलेले आहेत. मात्र, हिंमत हरलेले नाहीत. खूप चांगले काम ते करीत आहेत,’ अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास

राज्यातील काही पोलीस अधिकारी शासन पाडण्याच्या प्रयत्नात होते,’ हे विधान माझ्याकडून करण्यात आलेले नाही. मी बोललेलो ऑडिओ-व्हिडीओ क्लिप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

वाधवान यांना लॉकडाऊनमध्ये प्रवासाची परवानगी देऊन तत्कालीन प्रधान सचिव आणि पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून चूकच झाली. त्यांची चौकशी झाली आहे. मात्र, ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचेही देशमुख म्हणाले.

13 टक्के जागा रिक्त ठेवणार

पोलीस भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 25 ते 30 लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कागदपत्रांची छाननी व इतर कामांमुळे भरती प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे.  भरतीमध्ये मराठा तरुणांवर अन्याय होणार नाही. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन 13 टक्के जागा रिकाम्या ठेवून भरती केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या