
होळी म्हणजे रंगांची उधळण, मजा-मस्ती, आनंदाचा उत्सव, मात्र उत्सव साजरा करताना काही गोष्टींची काळजी घेतलेली केव्हाही चांगलीच असते. धुलिवंदन साजरे करताना पाणी, रंगांची उधळण केली जाते. रसायनयुक्त रंगांचा वापर केला जातो. तोंडाला, केसांवर हवे तसे रंग फासले जातात अशावेळी ते डोळ्यात जाण्याची शक्यताही असते. तर केस खराब होण्याचीही शक्यता असते. आपण उत्सव साजरा करताना कोणत्या गोष्टींची ध्यानात घ्यायला हव्या ते पाहुया.
– रसायनयुक्त रंगांनी त्वचेला अॅलर्जी होऊ शकते, तसेच त्याने त्वचा कोरडी होते. अशावेळी होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावण्याची गरज असते. होळी खेळण्यापूर्वी संपूर्ण शरीराला नारळाचे तेल किंवा राईचे तेल लावावे. त्यामुळे त्वचेवर कोणताही रंग टिकून राहत नाही. याच बरोबर पूर्णहाताचे कपडे घालावेत.
– रंग हेअर डाय सारखे असतात, जे केसांवर टाकल्यास केस रूक्ष होतात. केसांना रंगापासून वाचविण्यासाठी केसांना भरपूर तेल लावायचे. शक्य असल्यास डोक्याला हेअरकॅप घालावी.
– शक्यतो नैसर्गिक रंगांनी खेळा, त्याने हानी पोहोचणार नाही.
– पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
– अस्थमा रुग्ण असल्यास श्वसनासंबंधी कोणता त्रास असेल तर रंगासोबत खेळणे शक्यतो टाळा. रंगांचे बारीक कण श्वसनमाद्वारे शरीरात जाऊन त्रास होऊ शकतो.
– अनेकदा रसायनयुक्त रंग डोळ्यात जाऊन डोळ्यांची भरपूर जळजळ होते, असे जाणवल्यास लगेच डोळ्यांवर पाण्याचे हबके मारावेत आणि जळजळ थोडी कमी वाटल्यास गुलाब पाणी टाकावे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खेळताना डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स असेल तर ती खेळण्यापूर्वी काढून ठेवावी.
– होळी खेळताना निसरड्या ठिकाणी खेळू नये तिथे पडण्याची शक्यता असते. अशावेळी नीट जागा बघून खेळावी.
– नखं वाढलेली असतील तर ती आधी कापून घ्यावी. नखं वाढलेली असल्यास रंग नखांमध्ये राहतो आणि तो जेवताना पोटात जाण्याची शक्यता असते.



























































