
सामना प्रतिनिधी । नगर
लाखो भाविक भक्तांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा ता. पारनेर येथे होळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला.
सकाळी सहा वाजता श्री खंडोबाचे मंगलस्नान व पुजा झाल्यानंतर श्री व सौ अंकुश कोळेकर,जामखेड, गणेश व शुभांगी जगताप, रविशंकर व विभा उपाध्याय, मुबई यांच्या हस्ते श्री खंडोबाची विधिवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. यानंतर श्री खंडोबाची महाआरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त बन्सी ढोमे, किसन मुंडे, शांताराम खोसे, रामदास मुळे, संभाजी मुंढे, शंकर गायकवाड यांच्यासह भाविक उपस्थित होते.
साडेनऊ वाजता श्री खंडोबा उत्सव मुर्तीची पालखी मिरवणूक मंदिरातून वाजत गाजत निघाली. येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत भाविक भंडारा खोबरे यांची उधळण पालखीवर करत पालखीचे लोटांगण दर्शन घेत होते. पालखी मिरवणूक मंदीर प्रदक्षिणा करून लंगर तोडल्यानंतर पालखी मंदिरात परत आली.
सकाळी साडेदहा वाजता अंकुश कोळेकर, रा.वाकी, ता.जामखेड, रंगनाथ जगताप, सुदाम जगताप, लहु जगताप, विष्णु घुले, महादु घुले, गंगाराम घुले, विलास फाफाळे या भाविकांकडून उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
देवस्थान ट्रस्टकडून पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, वाहनतळ आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. संध्याकाळी भाविकांच्या दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती.




























































