
गोव्यात सध्या ठीकठिकाणी पारंपरिक शिमगोत्सव साजरा केला जात आहे. राजधानी पणजीमध्येही उद्या गुलालोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.कोरोनाच्या सावटामुळे दरवर्षी छत असलेल्या मंडपात होणार गुलालोत्सव उद्या मात्र छत नसलेल्या मंडपात होणार आहे. आरोग्य खात्याकडून आलेल्या सूचनेनंतर हे बदल करण्यात आले आहेत.
शिमगोत्सवा निमित्त पणजी शिमगोत्सव समितीतर्फे उद्या 10 मार्चपासून 14 मार्च पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या गुलालोत्सवाने त्याची सुरुवात होणार आहे. आझाद मैदानावर आकर्षक अष्टविनायक दर्शन घडवणारे व्यासपीठ उभरण्यात आले आहे. कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी गुलालोत्सव वीना छताच्या मंडपामध्ये होणार आहे. आरोग्य खात्याशी सल्ला मसलत केल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्या सकाळी 9 वाजता गुलालोत्सव सुरु होणार असून तो दुपारी 12.30 पर्यंत चालणार आहे. ऑर्केस्ट्रा ओम बीट्सच्या तालावर थिरकत लोकांना गुलालोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. गुलालोत्सव सेंद्रिय रंग वापरून खेळा, बाहेरुन आणलेले रासायनिक रंग वापरु नये असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे.लोकांची गर्दी होणार असल्याने कोरोना बाबत जनजागृती केली जाणार असून सर्दी खोकला असणार्यांनी शक्य तो गर्दीत मिसळणे टाळावे किंवा सुरक्षित अंतर ठेवून आनंद लुटावा,अशी सूचना वारंवार केली जाणार असल्याचे समिती सदस्य शांताराम नाईक यांनी सांगितले आहे.

























































