
होळीनिमित्त सुप्रीम कोर्टाला असलेली आठवडाभराची सुट्टी यंदा रद्द करण्यात आली आहे. होळीचा दिवस वगळता आठवडय़ातील सर्व दिवस सुप्रीम कोर्टात सुट्टीतील खंडपीठ सुरू राहणार आहे. मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे सुट्टीतील खंडपीठ हे उन्हाळी सुट्टीच्या काळातच कार्यरत असायचे, पण यंदा प्रथमच होळीची सुट्टी रद्द करून महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्ट 9 ते 15 मार्चदरम्यान कार्यरत राहणार आहे.
‘शबरीमाला’नंतरच ‘सीएए’वरील सुनावणी
शबरीमालासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच नागरिकता कायद्यावरील (सीएए) सुनावणी सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिले. मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीएए प्रकरणातील सुनावणी तत्काळ घेण्याची मागणी केल्यानंतर कोर्टाने हे निर्देश दिले. याप्रकरणी अद्याप केंद्र सरकारकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केंद्राकडून लवकरच उत्तर येईल असे स्पष्ट केले. सध्या सुप्रीम कोर्टाच्या नऊसदस्यीय खंडपीठासमोर शबरीमाला मंदिर आणि काही मशिदींमधील महिलांचा प्रवेश तसेच दाऊदी बोहरा समाजातील महिलांच्या खतना या प्रथेविरोधात कोर्टात प्रकरण प्रलंबित आहेत. हा प्रकरणांचा निकाल लागल्यानंतरच सीएएची सुनावणी होणार आहे.


























































