CAA च्या मुद्द्यावरून अमित शहा यांची राहुल गांधींवर टीका

681

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन करण्यासाठी आणि जनतेला या कायद्याची योग्य ती माहिती देण्यासाठी राजस्थानातील जोधपूरमध्ये सभा घेतली. या सभेत शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कडाडून हल्ला चढवला. या मुद्द्यावरून जनतेत पाहिजे तेवढा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करा. मात्र, हा कायदा लागू करण्यापासून आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, अशी घोषणा शहा यांनी केली. राहुल गांधी यांनी कायद्याचा अभ्यास केला असेल तर त्यांनी या मुद्द्यावरून चर्चेसाठी यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. राहुल बाबा यांनी कायद्याचा अभ्यास केला नसेल तर त्यांनी इटलीच्या भाषेत आपण भाषांतर पाठवण्यास तयार आहोत, असा टोलाही शहा यांनी लगावला.

ममता बॅनर्जी, समाजवादी पक्ष, बसपा, अरविंद केजरीवाल या कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे कसे नुकसान होणार आहे, हे विरोधकांनी सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. या मुद्द्यावर आपण कधीही चर्चा करण्यास तयार आहोत, असेही शहा म्हणाले. या कायद्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले तरी भाजप या कायद्यापासून एक इंचही मागे हटणार नाही. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, जनतेला या कायद्याबाबतची योग्य माहिती मिळावी, यासाठी भाजपकडून जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. वोटबँकेच्या राजकारणामुळे काही पक्ष या कायद्याला विरोध करत आहेत. काँग्रेसने या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल चालवली आहे. त्यामुळे अनेक तरुणांमध्ये संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी आम्ही जनजागरण अभियान सुरू केले आहे, असे शहा म्हणाले. शरणार्थिंना दिलेले आश्वासन भाजप सरकारने पूर्ण केले आहे, असेही शहा म्हणाले. या कायद्यामुळे शरणार्थिंना ‘अच्छे दिन’ आले आहेत. ते आता हिंदुस्थानचे नागरिक झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणालाही घाबरण्याची गरज नाही.

काँग्रेसनेही याबाबतचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही. आमच्या सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. या कायद्यामुळे ज्या शरणार्थिंना नागरिकत्व मिळणार आहे, त्यातील अनेक दलित आहेत. या कायद्याचा विरोध करणे म्हणजे दलितांना विरोध करण्यासारखे आहे, असे सांगत त्यांनी मायावती, अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. बंगली हिंदूनी ममता बॅनर्जी यांचे काय नुकसान केले आहे, असा सवालही शहा यांनी केला. ममता बॅनर्जी यांना फक्त आपली वोटबँक सांभाळयाची आहे. मात्र, जनतेने त्यांना घाबरू नये, असे आवाहनही शहा यांनी केले. लोकशाहीत जनतेची दिशाभूल करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. भाजप या मुद्द्यावरून तीन कोटी जनतेपर्यंत पोहचणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुकडे-तुकडे गँग देशात फूट पाडत असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या