
सामना प्रतिनिधी । मुंबई
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी क त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात येणार असून नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे. बँकेचा युजर आयडी, एटीएम/डेबिट कार्डचा क्रमांक व पीन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे. तसेच सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, त्यापासून वाचण्यासाठी काय करावे याबद्दलची माहिती देण्यासाठी गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नाकाने हँडल सुरू केले आहे. या हँडलवरून आवश्यक ती माहिती मिळणार असून त्यातून नागरिकांच्या माहितीत भर पडणार आहे.





























































