हनीमूनची गजाली : संदीप पाठक- कल्पना पाठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्पना, संदीप. सुरुवातीच्या काळात… मोजक्या पैशात मिळालेला एकमेकांचा सहवास… त्याची लज्जत काही न्यारीच!

मधुचंद्र म्हणजे – एकमेकांशी ओळख करून घेणं, एकमेकांना समजून घेऊन स्वभाव जाणून घेणं आणि एकमेकांना सगळ्या दृष्टीने कम्फर्टेबल करणं म्हणजे माझ्यासाठी मधुचंद्र.

फिरायला कुठे गेला होतात आणि प्लॅनिंग कोणी केले होते? – आम्ही फिरायला कोकणात दापोलीतील कर्दे गावात गेलो होतो. आम्हाला गर्दीच्या ठिकाणी जायचे नव्हते. त्यामुळे प्रायव्हसी हवी असेल तर आम्हाला अशाच ठिकाणी जावे लागणार होते. कल्पनाने सांगितल्यानंतर मी कोकणचे प्लॅनिंग केले. तिला कोकणाविषयी फार माहिती नव्हती. पण तिला ती जागा खूप आवडली.

तिथे आवडलेले ठिकाण – दापोलीच्या जवळ टेकडीवर आंजर्ल्याचा गणपती आहे. त्या गणपतीचे दर्शन घ्यायला गेलो होतो. तिथे प्रसन्न वाटले.

ठिकाणाचे वर्णन – डोंगराच्या पायथ्याशी हॉटेल होतं आणि खिडकीतून समुद्रकिनारा दिसत होता ते छान दृश्य होतं. मला असं नेहमी वाटतं की, आपल्या महाराष्ट्रात, विशेषकरून कोकणात अशी खूप निसर्गरम्य ठिकाणं आहेत. आपल्याला परदेशात जाण्याचीसुद्धा गरज नाही. कोकणातील अनेक ठिकाणांना निसर्गाबरोबरच इतिहासाची जोड आहे. अशी ठिकाणं मला आवडतात.

तिथे केलेली शॉपिंग – काजू, आंबावडी, खाजं, कोकम सरबत हे खाद्यपदार्थ घेतले होते.

काही खास क्षण – लग्न झालं तेव्हा मी स्ट्रगलर होतो, त्यावेळी फारसे पैसे नव्हते. त्यामुळे लग्नाच्या पाच-सहा महिन्यांनंतर आम्ही मधुचंद्रासाठी गेलो होतो. तेव्हा सात-साडेसात हजार रुपये खिशात होते. ती फार गंमत आहे. तेवढय़ा कमी पैशांत सगळं मॅनेज केलं होतं. मधुचंद्रासाठी ट्रव्हलने प्रवास केला होता. आता गाडी आहे, पैसे आहेत, पण ती मजा नाही. कारण आता खिशात किती पैसे आहेत हे माहीत नसते. त्यावेळी आम्ही कोकणात बऱयाच ठिकाणी टमटमने खूप फिरलो होतो. ते दिवस आम्हाला आठवतात. आता इच्छा असूनही टमटमने फिरता येत नाही. तेव्हा आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो की, अर्धा-पाऊण तास टमटमची वाट पाहायचो. ती जी गंमत आहे ती आता नाही. ती मजा तेव्हा आम्ही जगलो.

मधुचंद्र हवाच की.. – असायला हवाच. कारण मधुचंद्र हा फक्त विशिष्ट एका कारणासाठी नाही. एकमेकांशी बोलणं आहे, सुसंवाद साधणं आहे, एकांतपणा आहे. तो घरात राहून मिळत नाही. तो वेळ पुन्हा येत नाही. प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात सगळं अचिव्ह करतो. सुरुवातीला लग्न झाल्यावर आम्ही दोघंजण फिरायला गेलो होतो. ती जी मजा आहे ती पुढच्या आयुष्यात कधीही होऊ शकत नाही, ते जे गुलाबी दिवस आहेत ते पुन्हा येत नाहीत आणि संसार, मुलं या जबाबदाऱयांमध्ये व्यस्त होऊन जातो.

एकमेकांशी नव्याने ओळख – आमचं अरेंज मॅरेज आहे. लग्नाआधी आम्ही दोन-तीनदा भेटलो होतो. अटॅचमेण्ट वाढते, साथ सोडावीशी वाटत नाही. प्रत्येक वेळी ती हवीशी वाटते. तिचं असणं, हातात हात घालून हॉटेलमध्ये बसणं इतक्या छोटय़ा गोष्टी आहेत की, नंतर दूर जातात. तेव्हाचं आकर्षण असतं. तेव्हा बोलायला तास पुरत नाही, दिवस पुरत नाही. ही भावना नंतर राहत नाही. नव्याची ती नवलाई असते आणि ती असायला हवीच.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत? – नाही. त्याला दिवसांचं, तासांचं बंधन नाही. रोज आपल्याला नव्याने गोष्टी कळतात, तिचे विचार कळतात. तिचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विचार जेव्हा आपल्याला कळतात, दृष्टिकोन कळतो. नवऱयाविषयी तिच्या कॉन्सेप्ट कळतात, तिचं जगणं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला ती कळते, पण ती ओळख दोन-तीन दिवसांत नाही, तर रोज नव्याने होत असते.

तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – तिथे खाल्लेली सुरमई फ्राय आवडली होती.

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम – मी रोमॅण्टिक आहे आणि मला त्यासाठी ठिकाणाची गरज लागत नाही. नवरा-बायकोच्या रोमान्सला जागेचे बंधन नाही.

जोडीदाराची खास आठवण? – आम्ही मधुचंद्रासाठी दापोलीला ट्रव्हलने रात्रीचा प्रवास करत होतो. तिथे दोन सीटच्यामध्ये हात ठेवण्यासाठी दांडा असतो. त्यावर हात ठेवण्यासाठी तो मी जोरात खेचला. पण चुकून तो कल्पनाच्या पायाला लागला. ती जोरात बसमध्ये ओरडली. तेव्हा मी बोललो ‘‘ए बाई, जोरात ओरडू नकोस. रात्री कोणी विचारणार पण नाही आणि काही ऐकायच्या आत मला छेड काढतो समजून मारायला लागतील. नंतर तू सांगशील, माझा नवरा आहे’’. तो गमतीदार प्रसंग अजूनही विसरलो नाही.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – समंजस, खूप शांत, मितभाषी आहे. मी आणि माझा संसार सर्वस्व मानून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ती नाजूक आहे, पण माझ्यामागे पहाड उभा आहे असं मला वाटतं.