
राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे मुद्दे चव्हाट्यावर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पतीचा राज्य सरकारच्या थिंक टँकमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या मित्रा अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रोहित पवारांचा उपरोधिक टोला
महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्रावर मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत, तर आता अनिशजींचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातले संयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण राहील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
एक रुपयाही न घेता काम करणार
माझ्या पतीकडे पाच पदव्या आहेत. अनुभव बघूनच सरकारने त्यांना सल्लागार पद स्वीकारण्याची विनंती केली होती. ती अनिश यांनी स्वीकारली आहे. यात लपवण्यासारखं काहीही नाही. काहींनी अंजली दमानियांच्या पतीला राज्य सरकारकडून काहीतरी मिळालं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तसं नाहीये. एक रुपयाही न घेता ते कामे करणार आहेत, असा खुलासा दमानियांनी केला आहे.