उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात गुरुवारी दुपारी एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. भवाली परिसरातील सॅनिटोरियम-रातीघाट बायपास रस्त्यावरील धैला गावाजवळ भाविकांना घेऊन जाणाऱ्या महिंद्रा कारचे नियंत्रण सुटून तब्बल 100 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, UP 32 QU 1874 क्रमांकाच्या या कारमधील प्रवासी देवदर्शनाकरता निघाले होते. गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अचानक कार दरीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि एसएसबीची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. मंजुनाथ टी.सी. यांच्या निर्देशानुसार बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. खोल दरी आणि अरुंद रस्ता असल्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले. अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण होते. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनीही बचावकार्याला मोठी मदत केली. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट दरीत कोसळली. मात्र नेमका अपघात कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक (गुन्हे) डॉ. जगदीश चंद्र, सर्कल ऑफिसर रविकांत सेमवाल आणि प्रभारी निरीक्षक प्रकाश मेहरा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




























































