
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ आज मंगळवारी भीषण तिहेरी अपघात घडून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस, गुजरात पासिंगची कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये गुजरात राज्यातील व्यारा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून ते अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होते.
गुजरात पासिंगची सुझुकी स्विफ्ट कार, अमळनेर-चाळीसगाव एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात मंगरूळ गावाजवळ जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कार आणि दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत व्यारा (गुजरात) येथील नंदलाल गोपाल महाजन, निर्मला नंदलाल महाजन, सुरेश विक्रम महाजन आणि अनिता सुरेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलस्वार निलेश सुकदेव तावडे (रा. मालपूर, ता. शिंदखेडा) आणि फाल्गुनी एकनाथ भोई (रा. धरणगाव) यांचाही मृत्यू झाला.
अपघातात कारमधील आदित्य चंद्रकांत महाजन (रा. व्यारा, गुजरात) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच 112 आपत्कालीन सेवा, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच मंगरूळचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना ‘108’ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
























































