
देशभरातील 25 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाडय़ांमध्ये ई-पँट्री फूड बुकिंग सेवा सुरू केली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद सहज घेता येणार आहे.
ई-पँट्रीमुळे प्रवासी त्यांचे आवडते अन्न ऑनलाईन बुक करू शकतील आणि ते थेट त्यांच्या सीटवर पोहोचवले जाईल्. ज्या मेल-एक्सप्रेस गाडय़ांमध्ये तिकिटांच्या भाडय़ात भोजनाचा समावेश नाही, अशा गाडय़ांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. ज्या प्रवाशांना कन्फर्म, आरएसी आणि पार्शिअली कन्फर्म तिकिटे आहेत, ते स्टँडर्ड मिल (थाळी) सोबत रेल नीरची ऑर्डर देऊ शकतील. सध्या ही सुविधा केवळ निवडक 25 गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेस, नेत्रावती, पुष्पक एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस अशा ट्रेन्समध्ये ई-पँट्री सुरू केली आहे.


























































