
मुंबईत दोन वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात कमला मिलसारखी भीषण दुर्घटना घडली, मात्र त्यावरून पालिका प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नाही. मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा नाही, काही हॉटेल्समध्ये आरोग्य प्रमाणपत्रे नाहीत तरीही बिनदिक्कतपणे अशी हॉटेल्स सुरू आहेत. अशा हॉटेल्समध्ये येणाऱया मुंबईकरांच्या आणि काम करणाऱया कर्मचाऱयांच्या जिवाला धोका आहे असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. त्याची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबईत गेल्या काही महिन्यांत घडलेल्या आग आणि इतर दुर्घटनांचा अहवाल स्थायी समिती सभागृहात सादर करण्यात आला. त्यावर बोलताना पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसल्याचे सांगत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. मुंबईतील अनेक हॉटेल्स अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसतानाही सुरू आहेत. पालिकेचा कायदा धाब्यावर बसवला जात आहे अशा रेस्टॉरंटची संख्या मोठी आहे. दुर्घटना झाल्यावरच पालिका प्रशासन जागे होणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत पालिकेने अशा रेस्टॉरंटवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली. गेट वे ऑफ इंडिया येथील ‘वॉर्डन हाऊस’ या हॉटेलकडेही अग्नी आणि आरोग्य सुरक्षा प्रमाणपत्र नाही असा आरोप त्यांनी केला. अशी हॉटेल्स कशाच्या जोरावर सुरू आहेत, पालिकेचे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, कमला मिल दुर्घटनेतील एक हॉटेल पुन्हा सुरू झाले असून त्याला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वपक्षीयांनी या मुद्दय़ाला पाठिंबा देत चौकशीची मागणी केली.
मुंबईत पालिकेचे अग्निसुरक्षा आणि आरोग्य प्रमाणपत्र नसतानाही अशी हॉटेल्स सुरू असतील तर अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने अशा हॉटेल्सची पाहणी करून कारवाई करावी आणि त्याचा लेखी अहवाल पुढील बैठकीत सादर करावा.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

























































