कोणतीही नोटीस न देता घरे पाडली.

791

सार्वजनिक बांधकाम विभागाने वडजई रोडलगत असलेली अतिक्रमणे हटविताना आम्हाला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. आम्ही कोणतेही अतिक्रमण केले नसतानाही आमची घरे आमच्या डोळ्यादेखत पाडण्यात आली, असा आरोप वडजई कारवाईने बेघर झालेल्या रहिवाशांनी बांधकाम विभागावर केला आहे. ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वडजई रोडलगत असलेली अतिक्रमणे हटविली. त्या वेळी शाहीनबी शाह यांच्या घराची तोडफोड झाली आणि त्यात त्यांच्या घराचे नुकसान झाले. बांधकाम विभागाच्या या कारवाईवर शाहीनबी शाह या महिलेने आक्षेप घेतला आहे. नुकसान करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शाह आणि इतरांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी शाहीनबी शाह या महिलेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. आपल्या निवेदनात शाहीनाबी यांनी म्हटले आहे की, गेल्या तीस वर्षापासून मी आणि माझे कुटूंब येथे राहातो. सार्वजनिक बांधकाम विभागाने 14 जानेवारीला सकाळी दहा वाजता या परिसरातील अतिक्रमित बांधकामे काढली. माझे घर अतिक्रमित नसून बांधकाम विभागाने मला कुठलीही नोटीस दिलेली नव्हती. पण पोलीस बंदोबस्त घेऊन आलेले अभियंता एजाज शाह यांनी आदेश दिल्यानंतर जेसीबी चालकाने माझ्या घराची तोडफोड केली. त्यात अन्नधान्यासह संसारोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हावी. उपअभियंता एजाज शाह आणि इतरांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करावी. नुकसान भरपाई केली जावी, अशी मागणी शाहीनबी शाह यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या