
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्रीत शहरासह घोगरगावमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. श्रीगोंदा येथे दुर्योधन देवीसास वडेकर रा. हनुमाननगर येथील घरातून ८ तोळे सोने दागिने व २० हजार रुपयांचा ऐवज तर घोगरगाव येथील सुनील कसाब यांचे राहते घर फोडून २ तोळ्याचा नेकलेस व १० हजार रुपये रोख असे मिळून ३ लाख ३० हजार रुपयांची घरफोडी झाली असून घटनास्थळी डॉग स्कॉड पाचारण केले आहे.
दुर्योधन वडेकर आणि सुनील कसाब यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये साबाबत फिर्याद दिली आहे. वडेकर हे श्रीगोंदा शहराजवळ हिरडेवाडी येथील शेतघरात गेले होते. सायंकाळी पाऊस आला म्हणून ते तेथेच थांबले होते. सकाळी त्यांच्या शेजारी राहणारे विनोद तान्हाजी पाटील यांनी दुरध्वनी करून तुमच्या घरी चोरी झाली असल्याचे सांगितले. वडेकर हे घरी आले असता घराचा कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी ८ तोळे सोने व २० हजार रोख असा ऐवज चोरून नेला असल्याचे लक्षात आले.
तर दुसऱ्या एका घटनेत अज्ञात चोरट्यांनी घोगरगाव येथे रात्री घराचा दरवाजा तोडून सुनील कसाब यांचाही २ तोळे व १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घोगरगावात आणखी दोन ठिकाणी चोरी झाली पण त्याची माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळाची पहाणी केली आणि परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चड्डी – बनीयान घातलेले तीन तरुण पहाटे २:१५ वाजता दिसून आले. चोरांचे ठसे सापडले असून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे.






























































