हाऊसफुल्ल – ‘थप्पड’ सणसणीत

8242

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

सिनेमा आपण करमणुकीसाठी बघतो, पण कधी कधी काही सिनेमे करमणुकीच्या पलीकडे जाऊन आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीला इतकी सणसणीत चपराक लावतात की, त्याचे वळ थेट प्रेक्षकांच्या मनावरच उमटतात. असे वळ उमटवणारा ‘थप्पड’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय आणि बघणाऱया प्रत्येकाला या सिनेमाने जबरदस्त संदेश दिला आहे.
असे सिनेमे करमणुकीच्या गुदगुदल्या करण्यापेक्षा धक्का लावणारे असतात आणि अशा सिनेमांची खोटय़ा समजुतीत गुरफटलेल्या समाजाचे डोळे उघडण्यासाठी नितांत गरज असते.

ही गोष्ट आहे चारचौघींसारख्या एका संस्कारी, गृहकृत्यदक्ष, संसारी स्त्रीची. लग्न झाल्यावर सासरच तुझं सर्वस्व, स्वतःपेक्षा सासरच्यांना, नवऱयाला जपायचं. पती हा परमेश्वर असतो अशा विचारसरणीला घेऊन तिचं लग्न झालेलं असतं. लग्नानंतर घर, संसार यात तिने स्वतःला एवढं वाहून घेतलं असतं की, आपली आवड, आपल्या स्वप्नांना तिने अगदी सहज तिलांजली दिली असते. पण अशातच एका पार्टीमध्ये नवऱयाकडून रागाच्या भरात तिच्या गालावर सणसणीत थप्पड बसते. त्याची फ्रस्ट्रेशन्स अचानक या थपडेतून व्यक्त होतात. जगाला ही एक साधी थप्पड वाटत असली तरीही तिचं विश्व मात्र ढवळून निघतं. या एका थपडेतून अनेक नकळत झालेल्या आणि जाणूनबुजून दुर्लक्ष केलेल्या गोष्टींचे अर्थ उमगायला लागतात आणि तिचं संपूर्ण विश्वच बदलून जातं. काय होतं मग? एकच थप्पड एवढं रामायण का आणि कसं उभं करू शकतं? आणि यामागे अख्ख्या समाज विचारसरणीवर कसं भाष्य केलंय? हे जाणून घेण्यासाठी आणि त्यापेक्षाही जास्त आपल्या मनाला आरसा दाखवण्यासाठी हा सिनेमा पाहायलाच हवा.

या सिनेमाची बलस्थानं अनेक आहेत. त्यातलं सगळय़ात महत्त्वाचं बलस्थान म्हणजे तापसी पन्नू या अभिनेत्रीने साकारलेला अभिनय. कमी शब्दांत, पण अभिनयातून बोलणं आणि सहजता म्हणजे काय हे या सिनेमातून कळतं. तिने अख्खा सिनेमा स्वतःच्या खांद्यावर उचलला आहे. तिच्याशिवाय या सिनेमात ज्या विविध स्त्रिया आहेत त्या सगळय़ांनी मस्त कामं केली आहेत. मुळात स्त्राrवादी सिनेमा असल्यावर (खरं तर या सिनेमाला स्त्राrवादी म्हणणं चुकीचं आहे. याला सामाजिक सिनेमा म्हणणं जास्त समर्पक होऊ शकतं.) त्यातल्या प्रत्येक स्त्रीची विचारसरणी आणि वावरणाऱया प्रत्येक जणी आपल्या आजूबाजूलाच दिसत असतात. त्या इतक्या चपखल सिनेमात बसवल्या आहेत की, ती सहजता विषय अधिक प्रखरतेने आपल्यापर्यंत पोचवते. याशिवाय यातील नवऱयाचं काम साकारलेला किंवा वडिलांची भूमिका साकारलेले असे प्रत्येक कलाकारच खणखणीत आहेत.

लेखिका मृन्मयी लागू आणि दिग्दर्शक अभिनव सिंह यांचं धाडस कमालीचं आहे आणि ज्या पद्धतीने हा विषय थेट मांडलाय ते पाहता खरंच मनापासून कौतुक करावंसं वाटतं. सिनेमाची मांडणी, संगीताची जोड हे सगळं इतकं चपखल आहे की, एकूण सिनेमा एक अनुभव देऊन जातो. खरं तर आपल्या नेहमीच्या आयुष्यातली ती गोष्ट आपल्याला इतकी फालतू वाटत असते की, एवढय़ाशा गोष्टीला एवढं मोठं काय करायचं, अशी आपली अगदी सहज मनोवृत्ती बनते. पण कुठचीही गोष्ट सहज नसते. ‘थप्पड’ हा सिनेमा आपल्या त्याच्या शीर्षकापासून ते विषयापर्यंत आणि अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत आपल्याला हादरवतो आणि स्वतःच्या अस्तित्वाची किंवा विचारसरणीचीही जाणीव करून देतो. प्रत्येकाने हा अनुभव घेतलाच पाहिजे.

  • सिनेमा – थप्पड
  • दर्जा – ****
  • निर्माता – भूषण कुमार, किशन कुमार, अनुभव सिन्हा
  • दिग्दर्शक – अनुभव सिन्हा
  • लेखक – अनुभव सिन्हा, मृण्मयी लागू
  • संगीत – अनुराग सैकिया
  • कलाकार – तापसी पन्नू, पावेल गुलाटी, रत्ना पाठक शाह, तन्वी आझमी, दिया मिर्झा, राम कपूर, कुमुद मिश्रा.
आपली प्रतिक्रिया द्या