गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करताना विकासकाच्या संमतीची गरज नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी करताना विकासकाला त्याचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस देण्याची आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देऊन न्यायालयाने माटुंगा येथील मेरू हाईट्स सोसायटीची नोंदणी रद्द करणारे विभागीय सहनिबंधकांचे आदेश अवैध ठरवून नोंदणीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

रहिवाशांचा दावा
नोंदणी करताना काही गैरप्रकार केला अथवा चुकीची माहिती दिली तर नोंदणी रद्द करण्याचा अधिकार निबंधकांना आहे. नोंदणी करताना विकासकाला नोटीस देण्याची आवश्यकता नाही, असा दावा सोसायटीच्या वतीने वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी केला.विकासकाचा युक्तिवाद नोंदणी करताना विकासकाला नोटीस देणे बंधनकारक आहे. पण आम्हाला देण्यात आली नाही. रहिवाशांनी चुकीची माहिती सादर केली. त्यामुळे सोसायटीची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे, असा युक्तिवाद विकासक छेडा यांच्या वतीने वरिष्ठ वकील गिरीश गोडबोले यांनी केला.

न्यायालयाचे निरीक्षण
इमारतीमधील सर्व फ्लॅटची विक्री झाली असेल व सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन सोसायटीची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला असेल तर विकासकाला नोटीस देण्याची आवश्यकता नाही, असे न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण
मेरू हाईट्समधील रहिवाशांनी एकत्र येऊन ही इमारत अपार्टमेंट ओनरशीप अॅक्टमधून वगळण्याचा व सोसायटीची नोंदणी करण्याचा ठराव केला. हा ठराव केल्यानंतर विभागीय सहनिबंधकांकडे नोंदणीसाठी अर्ज केला. त्यानुसार सोसायटीची नोंदणी झाली. याच इमारतीत राहणाऱया विकासकाने यावर आक्षेप घेत नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला. त्याची दखल घेत नोंदणी रद्द करण्यात आली. त्याविरोधात येथील रहिवाशांनी याचिका केली होती.