
2 डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेच्या झालेल्या मतदानावेळी केंद्राजवळच हाणामारी झाली. रोहयोचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे नाव आरोपींमध्ये आहे. हाणामारीच्या वेळी ते प्रत्यक्ष तिथे हजर होते. मात्र पोलीस संरक्षण असतानाही गोगावले फरार कसे झाले, त्यांना अद्यापि का पकडले नाही, असा सवाल शिवगावचे सरपंच व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी केला. या मारहाणीची सखोल चौकशी करून विकास गोगावले यांना तडीपार करावे, अशी मागणीही ओझर्डे यांनी केली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाडमधील मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाणीचा उल्लेख सोमनाथ ओझर्डे यांनी केला. पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना शिरगावचे सरपंच म्हणाले की, गोगावले यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. मग तो पळून कसा जातो? ‘त्या’ पोलिसासह डीवायएसपी शंकर काळे यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. विकास गोगावले हे अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. जर त्यांना जामीन मिळाला तर त्याविरोधात आपण वरिष्ठ न्यायालयात दाद मागू, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. फरार असलेले विकास गोगावले हे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये होते, हे पोलिसांना दिसले नाही का? त्यांना वेगळा न्याय का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



























































